नवी दिल्ली : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा दशकातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचे मत संघाचे क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी व्यक्त केले. भारताने नुकतीच द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका निर्विवाद वर्चस्व राखून जिंकली. भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकेला ‘व्हाईटवॉश’दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलोआॅननंतर दुसरा डाव १३३ धावांवर आटोपला. एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवून भारताने मालिका ३-० ने खिशात घातली होती.
मालिकेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारत सरस ठरला. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस यानेही भारताच्या क्षेत्ररक्षणाची स्तुती केली. दरम्यान भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी जडेजाच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले.
ते म्हणाले,‘ भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर दिवसेंदिवस सुधारत आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा दशकातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. जडेजा मैदानावर असेल तर संघातील सहकाऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारते. तो प्रतिस्पर्धी संघाला एकही धाव सहजासहजी घेऊ देत नाही. प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरश: झगडावे लागते. जडेजाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची देणगी मिळाली आहे. गेल्या दशकात भारतीय संघाला लाभलेला जाडेजा हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरतो.’ भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ ते १० नोव्हेंबरदरम्यान तीन टी २० सामने होणार आहेत. त्यानंतर १४ ते २६ नोव्हेंबरमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल.