Ravindra Jadeja vs MS Dhoni Rift: IPL 2023 चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात सीएसके संघाने चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऋतुराज गायकवाडला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, अष्टपैलू रविंद्र जाडेजाला त्याच्या प्रशंसनीय कामगिरीसाठी 'मोस्ट व्हॅल्युएबल एसेट ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. गुजरातविरुद्ध हा पुरस्कार मिळालेल्या रवींद्र जाडेजाने एक खास ट्विट केले. त्या ट्विटवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि त्यांचे विचार शेअर करत आहेत.
रवींद्र जाडेजाने IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजीत 16 चेंडूत 22 धावांची खेळी केल्यानंतर गोलंदाजीत डेव्हिड मिलर आणि दासुन शनाका यांची अवघ्या 18 धावांत विकेट घेतली. यानंतर त्याला मोस्ट व्हॅल्युएबल एसेट ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर, त्याने स्वत: पुरस्कार हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, 'अपस्टॉक्सला माहित आहे पण.. काही चाहत्यांना नाही.' जाडेजाचे सूचक ट्विट-
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर दोघांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यात दावा करण्यात आला होता की दोघांमध्ये मतभेद आहेत. जाडेजाने सामन्यानंतर एक ट्विट केले आणि यामुळे चर्चेला उधाण आले. याशिवाय जाडेजाने यापूर्वीही असे ट्विट लाइक केले होते, ज्यावरून असे दिसते की चेन्नई आणि त्याच्यामध्ये सर्व काही ठीक चालले नाही