Ravindra Jadeja CSK: IPL 2022 हा हंगाम टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजासाठी खूपच निराशाजनक होता. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर IPLच्या १५व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रवींद्र जाडेजाला कर्णधार बनवले होते. मात्र जाडेजा कर्णधार म्हणून फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर धोनी (MS Dhoni) ने मागील काही सामन्यांमध्ये पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. एवढेच नाही तर जाडेजा दुखापतीमुळे CSKच्या उर्वरित सामन्यांतूनही बाहेर झाला. आता असं दिसतंय की रवींद्र जाडेजा CSKच्या कॅम्पमध्ये परतण्याच्या मनःस्थितीतच नाही. म्हणूनच त्यांच्या ब्रेक-अप तर झालेलं नाही ना.. अशा चर्चांना उधाण आलं आहे.
पुढचा IPL हंगाम सुरू होण्यापूर्वी रवींद्र जाडेजा लिलावात उतरण्याची शक्यता आहे. जाडेजा आणि CSKने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना आधीच अनफॉलो केले होते. आता तर जाडेजाने शुक्रवारी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून CSKच्या गेल्या तीन वर्षांतील सर्व पोस्ट काढून टाकल्या. यावरून जाडेजा आणि फ्रँचायझी यांच्यातील संबंध खूपच बिघडल्याचे दिसून येत आहे. रवींद्र जाडेजाच्या जवळच्या सूत्राने स्पोर्ट्स वेबसाइटला सांगितले की, 'तो खूप अस्वस्थ आहे आणि दुखावला गेला आहे. कर्णधारपदाचा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. सर्व काही अगदी अचानक घडले.गोष्टी ज्या प्रकारे आकार घेत होत्या, त्यानंतर कोणताही माणूस दुखावलाच असता.'
जाडेजाला १६ कोटींमध्ये केलं होतं रिटेन
२०१२ च्या लिलावात CSK मध्ये सामील झाल्यानंतर जाडेजाने या संघासोबत एकूण दहा वर्षे काम केलं. या प्रवासादरम्यान जाडेजाने CSKसोबत दोन IPL विजेतेपदे जिंकली. या कालावधीत सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणूनही तो नावारूपास आला. IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी जाडेजाला फ्रँचायझीने १६ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.