साऊदम्पटन : इंग्लंड दौऱ्यावर दाखल झालेल्या भारतीय संघात आऊटडोअर सरावाला सुरुवात करणारा रवींद्र जडेजा पहिला खेळाडू आहे. जडेजाने येथे एजेस बाऊलमध्ये गोलंदाजीचा सराव केला. त्याचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले.भारतीय संघाने ३ जून रोजी लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर बायो-बबलमध्ये प्रवेश केला. गोलंदाजीच्या सरावादरम्यान जडेजासोबत सपोर्ट स्टाफचा एक सदस्य उपस्थित असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ५१ कसोटी सामने खेळणाऱ्या जडेजाने कारकिर्दीत २२० बळी घेतले आहेत. त्याने १९५४ धावा केल्या असून त्यात एक शतक व १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रीनाथच्या विक्रमावर नजरजडेजाने जर इंग्लंडमध्ये एकूण सहा कसोटी सामन्यात १६ बळी घेतले तर तो जवागल श्रीनाथचा २३६ बळींचा विक्रम मोडेल. टीम इंडियातर्फे सर्वाधिक बळी घेण्यात जडेजा १० व्या क्रमांकावर आहे. त्याच्यापेक्षा जास्त बळी अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), जहीर खान (३११), ईशांत शर्मा (३०३), बिशनसिंग बेदी (२६६), बी.एस. चंद्रशेखर (२४२) आणि श्रीनाथ (२३६) यांनी घेतले आहेत. जडेजाला इंग्लंड दौऱ्यात श्रीनाथचा विक्रम मोडण्याची संधी आहे. यादरम्यान त्याला अनेक अन्य खेळाडूंनाही पिछाडीवर सोडण्याची संधी आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सिडल (२२१), दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वर्नोन फिलँडर (२२४) आणि इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू ॲण्ड्र्यू फ्लिन्टॉफ (२२६) यांचा समावेश आहे.