बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक फेरबदल दिसून येत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाचं मध्यवर्ती करारामध्ये प्रमोशन झालं असून, त्याचा ए प्लस खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्यालाही बढती देत त्याचा बी श्रेणीतून ए श्रेणीत समावेश कऱण्यात आला आहे. मात्र अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, रिद्धिमान साहा, मयांक अग्रवाल यांना मध्यवर्ती करारामधून वगळण्यात आलं आहे. मात्र दुखापतीमुळे बरेच दिवस असलेल्या जयप्रीत बुमराह याला मात्र ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे.
बीसीसीआयने खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणीत विभागून करार केले आहेत. त्यालील ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआय वर्षाला ७ कोटी देईल. तर ए श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतील. बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेली करारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे आहे. ए प्लस श्रेणी - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.ए श्रेणी - हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, अक्षर पटेल. बी श्रेणी - चेतेश्वर पुजारा, के. एल राहुल. श्रेयस अय्यर. मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल. सी श्रेणी - उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के.एस. भारत.