bcci contract salary । मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022-23 या वर्षासाठी भारतीय खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. या करारामध्ये काही खेळाडूंचे प्रमोशन झाले आहे तर काहींचे डिमोशन झाले आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाचे प्रमोशन झाले आहे, आता तो A+ मध्ये आला आहे. तर लोकेश राहुलचे डिमोशन झाले असून त्याची ए ग्रेडवरून बी ग्रेडमध्ये घसरण झाली आहे. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट यादीत एकूण 26 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रेड A+ मध्ये कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आपली जागा कायम ठेवली आहे. आता रवींद्र जडेजाच्या आगमनाने या श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंची संख्या चार झाली आहे. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत या चार खेळाडूंना प्रत्येकी 7 कोटी रूपये मिळणार आहेत.
पांड्या-अक्षरचेही झाले प्रमोशनहार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांना ग्रेड ए मध्ये स्थान मिळाले आहे. खरं तर अक्षर पटेल या आधी ग्रेड बी मध्ये होता आणि हार्दिक पांड्या ग्रेड सी मध्ये होता, मात्र आता त्यांचे प्रमोशन झाले आहे. तर चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल हे ग्रेड बी मध्ये आहेत. यावेळी शुबमन गिललाही बढती देण्यात आली आहे. ग्रेड बी मध्ये असलेल्या खेळाडूंना 3 कोटी रूपये मिळणार आहेत.
तसेच उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत यांना ग्रेड सी मध्ये स्थान मिळाले असून त्यांना 1 कोटी रूपये मिळतील. भरत, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे.
काही खेळाडूंचा पत्ता कट वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेला कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळाले नाही. रहाणे आणि इशातं मागील हंगामात ग्रेड सी मध्ये होते. रिद्धिमान साहा, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी, सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू दीपक चहर यांनाही वगळण्यात आले आहे. यावेळी A+ श्रेणीमध्ये चार, A मध्ये पाच, B श्रेणीमध्ये सहा आणि C श्रेणीमध्ये सर्वाधिक 11 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
करारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे आहे
- ए प्लस श्रेणी (7 कोटी वार्षिक) - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
- ए श्रेणी (5 कोटी वार्षिक) - हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, अक्षर पटेल.
- बी श्रेणी (3 कोटी वार्षिक) - चेतेश्वर पुजारा, के. एल राहुल. श्रेयस अय्यर. मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल.
- सी श्रेणी (1 कोटी वार्षिक) - उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के.एस. भरत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"