जामनगर - भारतीय संघातील क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाने जामनगर आणि अमरेलीमधील स्थानिक टी-20 सामन्यात तुफान फटकेबाजी करुन उपस्थितांची मने जिंकली. सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात जाडेजाने चौफेर फटकेबाजी केली. जामनगरकडून खेळणा-या जाडेजाने एका षटकात सहा षटकार ठोकले आणि 69 चेंडूत 154 धावा केल्या.
रवींद्र जाडेजाच्या फलंदाजीच्या बळावर जामनगरच्या संघाने 20 षटकात 6 विकेट गमावून 239 धावा ठोकल्या. जाडेजाने दहाव्या षटकापासून फलंदाजी सुरु केली. 15 व्या षटकात त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. भन्नाट फलंदाजीचे प्रदर्शन करणा-या जाडेजाने 10 षटकार, 15 चौकारांच्या मदतीने 154 धावा केल्या.
जामनगरने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमरेलीच्या संघाने निर्धारीत 20 षटकात पाच विकेट गमावून फक्त 118 धावा केल्या. अमरेलीकडून विशाल वसोयाने 36 आणि निलाम वाम्दाने 32 धावा केल्या. जामनगरच्या महेंद्र जेठवाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अमरेलीचे कंबरडे मोडले. महेंद्रने चार षटकात सहा धावा देऊन तीन विकेट काढल्या. जामनगरने हा सामना 121 धावांनी जिंकला असून त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत.