CSK vs GT : गतविजेच्या गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नईने आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला. एकतर्फी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची पळता भुई थोडी केली. CSK चा अष्टपैलू रवींद्र जडेजाने काल शानदार कामगिरी केली. चेन्नईच्या मागील सामन्यानंतर जडेजाला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. पण आपल्या अप्रतिम खेळीने जड्डूने संघाला फायनलमध्ये पोहचवून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.
जडेजाने १६ चेंडूत २२ धावांची साजेशी खेळी करून गुजरातसमोर सन्मानजनक लक्ष्य ठेवण्यात हातभार लावला. याशिवाय जड्डूने आपल्या फिरकीच्या तालावर गतविजेत्यांना नाचवताना ४ षटकांत केवळ १८ धावा दिल्या अन् २ बळी घेतले. म्हणूनच त्याला सामन्यातील सर्वात मौल्यवान (most valuable player of the match) खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार घेतानाचा फोटो शेअर करून जड्डूने काही चाहत्यांची बोलती बंद केली.
त्याने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "अपटॉक्सला पण हे माहित आहे, परंतु काही चाहत्यांना नाही." एकूणच जडेजाने सांगितले की, अपटॉक्सला माहिती आहे की, तो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहे पण काही चाहत्यांना हे समजत नाही. तसेच जडेजाने या सामन्यातून आयपीएलमध्ये आपले १५० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये अशी किमया साधणारा तो दहावा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, जड्डूची पत्नी तथा आमदार रिवाबा जडेजानेही त्याच्या या अप्रतिम कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पतीचे फोटो शेअर करत रिवाबाने म्हटले, "मेहनत इतक्या शांतपणे करा की, तुमचे यश धिंगाणा घालेल."