चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी ( २९ मे) गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा इंडियन प्रीमिअर लीग ट्रॉफीवर कब्जा केला. मंगळवारी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत रंगलेल्या या सामन्यात CSK ने गतविजेत्या गुजरात टायटन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर ६,४ मारून हा विजय मिळवून दिला. त्यानंतर तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई ( K Annamalai) यांनी CSKच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. संघाचे अभिनंदन करताना अन्नामलाई म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा भाजपचा कार्यकर्ता आहे.
रवींद्र जडेजा हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे ट्विट तामिळनाडूच्या भाजप नेते अन्नामलाई यांनी केले. रवींद्रची पत्नी रिवाबा जडेजा या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार आहेत आणि त्या गुजराती आहेत. अन्नामलाई म्हणाले की, भाजप कार्यकर्ता जडेजाने सीएसकेला विजय मिळवून दिला आहे.
अन्नामलाई यांच्या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. सीएसकेचा विजय गुजरात मॉडेलवर द्रविड मॉडेलचा विजय म्हणून सादर करून भाजपला टोमणे मारण्यात आले. भाजप प्रमुखांनी हे ट्विट तमिळ भाषेत केले आहे. एका खाजगी टीव्ही चॅनेलच्या अँकरशी बोलताना अन्नामलाई म्हणाले की, सीएसकेने हा सामना जिंकला याचा मला अभिमान वाटतोय. कारण सीएसकेकडे अधिक तमिळ खेळाडू आहेत. यासोबतच गुजरातच्या लोकांनीही आनंद साजरा केला पाहिजे.''
या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. तामिळनाडूचा फलंदाज साई सुदर्शनने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूत 96 धावा केल्या. मात्र, पावसामुळे सामना 15 षटकांचा करण्यात आला, त्यामुळे सीएसकेला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले.