Ravindra Jadeja is now the new No.1- श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत नाबाद १७५ धावा आणि दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेत रवींद्र जडेजाने अनेक विक्रम मोडले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीला आयसीसीकडूनही दाद मिळाली आहे. ICC Men’s Test All-Rounder Rankings ( अष्टपैलू खेळाडू) मध्ये भारताच्या 'सर' रवींद्र जडेजाने अव्वल स्थान पटकावले. जडेजाने सहकारी आर अश्विन व वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर यांना मागे टाकताना हा पराक्रम केला. होल्डरची दुसऱ्या स्थानी, तर अश्विनची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजाने दोन स्थान वर झेप घेताना ४०६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अश्विन ३४७ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत माजी कर्णधार विराट कोहलीनेही ( Virat Kohli) दोन स्थानांची सुधारणा करताना पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. विराट ७६३ रेटिंग गुणांसह पाचव्या क्रमांकावर आला असून त्याने कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( ७६१ रेटिंग गुण) याला सहाव्या क्रमांकावर ढकलले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत रिषभ पंतने ९६ धावांची खेळी केली होती आणि त्यामुळे त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकून टॉप टेनमध्ये १०वे स्थान पटकावले.
ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ( ९३६), इंग्लंडचा जो रूट ( ८७२), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( ८५१) आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( ८४४) हे टॉप फाईव्हमध्ये आघाडीवर आहेत. मार्नस लाबुशेन हा सर्वाधिक रेटिंग गुण घेणाऱ्या फलंदाजांमध्ये १२ व्या क्रमांकावर आला आहे. रिकी पाँटिंग, स्मिथ व डॉन ब्रॅडमन या ऑसी फलंदाजांनी त्याच्यापेक्षा अधिक रेटिंग गुण कमावले आहेत.
रवींद्र जडेजा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत १५०+ धावा व पाच विकेट्स घेणारा तो सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी विनू मांकड (184 & 5/196) वि. इंग्लंड, १९५२, डेनिस अॅटकिंसन (219 & 5/56) वि. ऑस्ट्रेलिया, १९५५, पॉली उम्रीगर ( 172* & 5/107) वि. वेस्ट इंडिज, १९६२, गॅरी सोबर्स ( 174 & 5/41) वि. इंग्लंड, १९६६ आणि मुश्ताक मोहम्मद ( 201 & 5/49) वि. न्यूझीलंड, १९७३ यांनी हा पराक्रम केला आहे.
भारताकडून एकाच कसोटीत १५०+ धावा व ५ विकेट्स घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. विनू मांकड (184 & 5/196) वि. इंग्लंड आणि पॉली उम्रीगर ( 172* & 5/107) वि. वेस्ट इंडिज, १९६२ यांनी हा पराक्रम याआधी केला होता. एकाच कसोटीत ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन १५०+ धावा आणि नंतर गोलंदाजीत पाच विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डेनिस अॅटकिंसन यांनी १९५५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१९ धावा व ५/५६ अशी कामगिरी केली होती.