ऑस्ट्रेलियाचे त्यांच्याच घरच्या मैदानावर गर्वहरण केल्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतली. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर टीम इंडियाचे शिलेदार स्वतःच्या घरच्या मैदानावर तगड्या इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना माघार घ्यावी लागली. पण, ते आता इंग्लंड दौऱ्यासाठी तंदुरुस्त होऊन मैदानावर उतरण्यास उत्सुक आहेत. त्यामुळेच BCCIनं पहिल्या दोन कसोटीसाठीच संघ जाहीर केला. त्यात आर अश्विन, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल या ऑसी दौऱ्यावर दुखापत झालेल्या आणि आता पूर्णपणे तंदुरूस्त झालेल्या खेळाडूंची नावं आहेत. पण, उर्वरित दोन कसोटींसाठी ज्या अष्टपैलू खेळाडूचं नाव चर्चेत होतं, त्यानं संपूर्ण मालिकेतूनच माघार घेतल्याचे, वृत्त समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मालिकेत तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यानं उर्वरित मालिकेतून माघार घेतली. जडेजा इंग्लंड मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यानं फक्त कसोटी मालिकेतूनच नव्हे, तर वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जडेजा उर्वरित दोन कसोटींपूर्वी तंदुरुस्त होण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय तो मर्यादित षटकांच्या मालिकेलाही मुकणार आहे.
''तो कसोटी मालिकेला मुकणार आहे आणि त्याला तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवड्यांहून अधिक काळ लागेल. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करायचा की नाही, याबाबतचा निर्णय निवड समिती लवकर घेईल,''असे BCCIच्या अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. टीम इंडियाच्या शिलेदारांसहच जडेजा गुरुवारी मायदेशात परतला आणि त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात येईल. त्याच्या माघारीबाबत BCCIनं कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. बीसीसीआयनं पहिल्या दोन कसोटीसाठी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचा संघात समावेश केला आहे.
वॉशिंग्टन सुंदर हा पर्यायही संघाकडे आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर,
नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार
राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.
भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक ( India vs England Full Time Table)
कसोटी मालिका -
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद
ट्वेंटी- 20 मालिका (सर्व सामने अहमदाबाद)
१) १२ मार्च पहिला टी-२०
२) १४ मार्च दुसरा टी-२०
३) १६ मार्च तिसरा टी-२०
४) १८ मार्च चौथा टी-२०
५) २० मार्च पाचवा टी-२०
वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे
Web Title: Ravindra Jadeja out of England Test series, participation in shorter formats also not certain: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.