Join us  

ग्रीनने जोरात फटका मारला, जाडेजाने 'बुलेट' झेल पकडला; अंपायरची झाली अशी अवस्था,Video

स्फोटक फलंदाजी आणि रवींद्र जडेजाची दमदार फिरकी या जोरावर चेन्नईने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ७ गड्यांनी नमवले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 1:42 PM

Open in App

चेन्नई सुपरकिंग्जकडून पहिल्यांदाच आयपीएल सामना खेळलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या 'घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली. त्याची स्फोटक फलंदाजी आणि रवींद्र जडेजाची दमदार फिरकी या जोरावर चेन्नईने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच मैदानावर ७ गड्यांनी नमवले. 

चेन्नईने मुंबईला २० षटकांत ८ बाद १५७ धावांत रोखले. यानंतर चेन्नईने १८.१ षटकांत बाजी मारताना ३ बाद १५९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात जेसन बेहरेनडॉर्फने डीवोन कॉन्वेला त्रिफळाचीत करत चेन्नईला धक्का दिला. मात्र, यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या अजिंक्यने निकाल स्पष्ट करत केवळ १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या फटकेबाजीपुढे मुंबईकरांनी जणू हार मानली. रहाणेने ऋतुराज गायकवाडसह दुसऱ्या गड्यासाठी ४४ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली.

मुंबईचा रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मुंबईने सर्वाधिक पैसे खर्च केलेला खेळाडू ग्रीन आणि तिलक वर्मा मैदानात होते. दोघे सावधपणे खेळत होते, त्यावेळी ग्रीनने जडेजाच्या चेंडूवर जोरात फटका मारला. चेंडू इतका जोरात होता की समोर जडेजाने हात फक्त वर केले तेव्हा त्याच्या एकदम हातात जावून बसला. 

चेंडू जर त्या ठिकाणी जडेजा नसता तर स्टम्पजवळ असलेल्या पंचांना लागला असता. हा चेंडू काही फक्त लागला नसता त्यांना मोठी इजाही झाली असती. कारण ग्रीनने चेंडूच तितक्या वेगाने मारला होता. कॅमेरून ग्रीनचा फटका इतका जबरदस्त होता की पंचही घाबरले. शॉट खेळताच तो आपल्या जागेवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना खाली पडले, पण जडेजाने चेंडू त्याच्या जवळ येऊ दिला नाही.

दरम्यान, डीआरएस म्हणजे 'धोनी रिव्ह्यू सिस्टिम' असल्याचे महेंद्रसिंग धोनीच्या अचूक निर्णयामुळे पुन्हा एकदा दिसून आले. आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सँटनरला स्वीप फटका मारण्याचा सूर्यकुमारचा अंदाज चुकला आणि चेंडू धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. चेन्नईने झेलबादचे अपील केल्यानंतर पंचांनी वाईड बॉलचा निर्णय दिला. यावर धोनीने लगेच डीआरएस मागितला आणि रिप्लेमध्ये चेंडू सूर्याच्या बॅटला लागून गेल्याचे स्पष्ट झाले. 

टॅग्स :रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२३
Open in App