नवी दिल्ली : दुखापतीमुळे गेले काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) झालेली तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तो गुरुवारी नागपुरात दाखल झाला. २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान भारतीय संघाचे सराव शिबिर नागपूरच्या व्हीसीए मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये संघातील इतर सदस्यांसमवेत आता जडेजाही सहभागी होईल.
बुधवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रवींद्र जडेजाची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. सर्व आघाड्यांवर आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यावर त्याला एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत जडेजाच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो गेल्या सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धेवेळी जडेजाची दुखापत बळावली होती. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकाला जडेजाला मुकावे लागले होते.
श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेरपाठीच्या दुखण्यामुळे ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या नागपूर कसोटीतून श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. पाठीच्या खालच्या भागाला सूज असल्यामुळे अय्यरला एक इंजक्शन देण्यात आले असून, त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागेल. यामुळे आता सूर्यकुमारला नागपूर कसोटीत संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कसोटीत महत्त्वाचा खेळाडूअष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. कारण केवळ गोलंदाजीच नाही तर गेल्या काही काळापासून त्याने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. विशेषत: भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजीइतकीच त्याची फलंदाजीही बहरते. भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या ६० कसोटी सामन्यांमध्ये त्याने २५२३ धावा केल्या आहेत. तसेच २४२ बळीही त्याच्या नावावर आहेत. यापैकी ३६ कसोटी त्याने भारतात खेळल्या. ज्यामध्ये जडेजाने १४५७ धावा आणि १७२ बळी आपल्या नावे केलेले आहेत.
द्रविडसोबत नागपुरात दाखलअष्टपैलू रवींद्र जडेजा हा भारतीय संंघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांच्यासोबत गुरुवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाला. या दोघांशिवाय सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि अक्षर पटेल हेदेखील नागपुरात दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जामठा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू विविध शहरातून येथे दाखल होत आहेत. यजमान संघातील काही खेळाडू शुक्रवारी आणि शनिवारी सिव्हिल लाइन्सच्या व्हीसीए मैदानावर सरावास प्रारंभ करतील.
रणजीत घेतले ८ बळी दुखापतीतून सावल्यानंतर जडेजाने २४ जानेवारीपासून सुरू झालेल्या तामिळनाडूविरुद्धच्या रणजी सामन्यात सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या सामन्यात त्याने एकूण ४१.१ षटकांची गोलंदाजी केली. पहिल्या डावात एक, तर दुसऱ्या डावात ७ बळी घेण्यात तो यशस्वी ठरला. तसेच फलंदाजीतही जडेजाने उपयुक्त खेळी केली.