Ravindra Jadeja Retirement : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजेयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) मैदानातून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मानेही (Rohit Sharma) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता या यादीत रवींद्र जडेजाचेही नाव जोडले गेले आहे. जडेजाने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करुन T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, ''मी जड अंत:करणाने T20 इंटरनॅशनलला निरोप देत आहे. मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिले आहे. T20 विश्वचषक जिंकल्यामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले. मला आतापर्यंत पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो."
जडेजाची वर्ल्ड कपमधील कामगिरीरवींद्र जडेजाने या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सर्व 8 सामने खेळले. पण, ना तो फलंदाजीत दमदार कामगिरी करू शकला, ना गोलंदाजीत काही प्रभाव पाडू शकला. त्याला 7 सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, यात त्याने फक्त 1 बळी घेतला, तर 5 डावात केवळ 35 धावा काढल्या. मात्र, अप्रतिम फिल्डिंग करुन त्याने संघासाठी अनेक धावा नक्कीच वाचवल्या.