इंडियन प्रीमियर लीगला (IPL) 2022 आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर आमनेसामने येणार आहेत. चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सामना खास असणार आहे, कारण यावेळी महेंद्रसिंग धोनी नव्हे तर रवींद्र जडेजा संघाची कमान सांभाळणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जनं रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून घोषीत केलं आहे. या निर्णयानंतर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाचं वक्तव्य समोर आलं आहे. रिवाबानं तिच्या फेसबुक अकाऊंटवर सीएसकेचे आभार मानले आणि महेंद्रसिंग धोनीचे विशेष आभारही मानले आहेत.
रिवाबाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'हे यश मिळवल्याबद्दल अभिनंदन, तू यासाठी नक्कीच पात्र आहेस. माही भाईचे खास आभार, त्यांनी विश्वास दाखवला आणि ही संधी दिली. तुम्ही नेहमीच त्याचं प्रेरणास्थान राहाल आणि संघाचे थाला राहाल". रिवाबानं या पोस्टसोबत धोनी-जडेजाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये CSK चे थीम सॉंग बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे.
एमएस धोनीने आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना धक्का दिला. सीएसकेकडून एक निवेदन जारी करण्यात आलं ज्यात एमएस धोनीनं आता रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असेल असा निर्णय घेतला आहे आणि व्यवस्थापनानं त्याच्या निर्णयाचं स्वागत केलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
रवींद्र जडेजा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाची कमान सांभाळणार असून त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "मला कशाचीही चिंता नाही, कारण एमएस धोनी सोबत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच", असं जडेजानं म्हटलं आहे.
Web Title: ravindra jadeja rivaba wife reaction on captaincy thanks ms dhoni csk ipl 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.