Ravindra Jadeja vs CSK Rift Controversy, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार रवींद्र जडेजा IPL 2022 मधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी संध्याकाळी एक ट्वीटच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी याबद्दलच्या चर्चांना दुजोरा दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्या संघातील समावेशाबाबत शंका होती. तसेच, जाडेजा आणि CSK यांच्यात काही वाद असल्याचीही चर्चा रंगली होती. तशातच अचानक CSK ने हा निर्णय़ जाहीर करण्यात आला.
चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी संध्याकाळी जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, रवींद्र जडेजा बरगडीच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध नव्हता. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. या आधारावर त्याला IPL 2022 च्या उर्वरित मोसमातून वगळण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रवींद्र जाडेजाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या. चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा दावा केला जात होता. कारण चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जाडेजाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, त्याचप्रमाणे रवींद्र जाडेजाही कोणालाही फॉलो करत नाही. अशा स्थितीत चर्चांना उधाण आले होते.
IPL 2022 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली, परंतु खराब कामगिरीमुळे रवींद्र जडेजाने मध्यभागी कर्णधारपद सोडले. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ८ पैकी ६ सामने गमावले. एकीकडे रवींद्र जाडेजाने कर्णधारपद परत दिले आणि त्यानंतर तो प्लेइंग ११ मधूनही बाहेर पडला. मात्र, याचे कारण दुखापत होते. पण आता उर्वरित स्पर्धेतूनच तो बाहेर पडला असल्याने त्यांच्यातील वाद अधोरेखित झाला असल्याची चर्चा आहे.