नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका या 3 संघानी सुपर-4 फेरी गाठली आहे. तर आज होणाऱ्या हॉंगकॉंग आणि पाकिस्तान यांच्यामधील विजयी संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करेल. आशिया चषकाची स्पर्धा मुख्य टप्प्यावर आली असतानाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला असून अक्षर पटेलला आशिया चषकाच्या संघात स्थान मिळाले आहे.
दरम्यान, भारताच्या संघ निवड समितीने अक्षर पटेलला जडेजाच्या जागी संघात स्थान दिले असल्याचे जाहीर केले आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, अशी माहिती बीसीसीआयने एका निवेदनातून दिली. लक्षणीय बाब म्हणजे अक्षर पटेलला याआधी संघातील एक स्टँडबाय म्हणून घोषित करण्यात आले होते. जडेजाच्या दुखापतीमुळे तो लवकरच दुबईत संघासोबत सामील होणार आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.