भारतीय संघात सध्या बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. विराट कोहलीकडून वन डे संघाचे, तर फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उप कर्णधारपद काढून घेण्यात आलं. या दोन्ही जबाबदाऱ्या रोहित शर्माकडे सोपवण्यात आल्या. त्यावरून विराट विरुद्ध रोहित असा वादाचा सामना रंगत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात भारतीय संघाच्या यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या निवृत्तीचे वृत्त समोर येत आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेणारा जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत आहे आणि याबाबत तो लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे वृत्त काही इंग्रजी वेबसाईट्सनी दिले आहे.
जडेजा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्यानं कमबॅक केले. पण, आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यालाही दुखापतीनं पुन्हा घेरलं आणि त्यामुळे कसोटी मालिकेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. त्यामुळे तो आता फक्त वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहे. कसोटी संघात जडेजा हा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात त्याचे भरीव योगदान राहिले आहे. त्यात क्षेत्ररक्षणातील त्याची कामगिरी ही नेहमीच उजवी ठरली आहे.
३३ वर्षीय जडेजानं ५७ कसोटी, १६८ वन डे व ५५ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे २१९५, २४११ आणि २५६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १ शतक व १७ अर्धशतकं, वन डेत १३ अर्धशतकं आहेत. आयपीएलमध्ये त्यानं २०० सान्यांत २३८६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीचा विचार केल्यास कसोटीत त्याच्या नावावर २३२ विकेट्स आहेत. वन डे त १८८ आणि ट्वेंटी-२०त ४६ बळी त्याने टिपले आहेत.