भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बुधवारी दुपारी बीसीसीआयच्या सूत्रांवरून चालवल्या गेलेल्या बातम्यांची चौफेर धुलाई केली. पण, त्याचवेळी त्यानं बीसीसीआयच्या वागण्यावरही भाष्य केलं. विराटच्या पत्रकार परिषदेच्या बातम्या वाचून संपतात, तेच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं मोठी घोषणा केली. मंगळवारी रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या निवृत्तीचे वृत्त समोर आले होते. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेणारा जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत आहे आणि याबाबत तो लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे वृत्त काही इंग्रजी वेबसाईट्सनी दिले आहे. त्यावर जडेजानं मौन सोडले.
जडेजा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्यानं कमबॅक केले. पण, आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यालाही दुखापतीनं पुन्हा घेरलं आणि त्यामुळे कसोटी मालिकेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. कसोटी संघात जडेजा हा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात त्याचे भरीव योगदान राहिले आहे. त्यात क्षेत्ररक्षणातील त्याची कामगिरी ही नेहमीच उजवी ठरली आहे.
जडेजानं या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या वृत्तावर मौन सोडताना सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले. एकात तो कसोटी क्रिकेटच्या जर्सीत दिसत असून त्यावर त्यानं अजून फार दूरचा पल्ला गाठायचाय ( Long way to go) असे लिहिले आहे, तर दुसऱ्या फोटोत खरे मित्र अफवांवर नाही तर तुमच्यावर विश्वास ठेवतात, असे लिहिले आहे.