भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे ठरवले. पहिल्या डावात १ विकेट अन् केवळ १५ धावाच करता आल्याने जडेजावर टीका झाली आणि टीम इंडियाची डोकेदुखी वाढली. पण, जडेजाने तामिळनाडू विरुद्धच्या या सामन्यात दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेत सौराष्ट्रला विजयाचा मार्ग दाखवला.
तामिळनाडूने पहिल्या डावात बी इंद्रजित ( ६६), विजय शंकर ( ५३) व शाहरुख खान ( ५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३२४ धावा केल्या. बी साई सुदर्शन ( ४५) व बाबा अराजित ( ४५) यांनीही योगदान दिले. या डावात जडेजाला २४ षटकांत ४८ धावा देत केवळ १ विकेट घेतली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सौराष्ट्रचा डाव १९२ धावांवर गडगडला. कर्णधार जडेजाने केवळ १५ धावा केल्या. दुसऱ्या डावात जडेजाने तामिळनाडूच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. त्याने १७.१-३- ५३-७ अशी उल्लेखनीय गोलंदाजी करून तामिळनाडूचा संघ १३३ धावांवर गुंडाळला.
जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. जडेजाने ५३ धावांत ७ विकेट्स घेतल्या आणि रणजी करंडक स्पर्धेतील ही त्याची दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २००८मध्ये त्याने हैदराबादविरुद्ध ३१ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. तामिळनाडूकडून सुदर्शन ( ३७) व इंद्रजित ( २८) हेच चांगले खेळले. २६६ धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रने ४ धावांत १ विकेट गमावली आहे.
रवींद्र जडेजा गेल्या ७ महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. आशिया चषकादरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले होते, परंतु पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला पुन्हा वगळण्यात आले. बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर आता त्याचे नाव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"