नागपूर : टीम इंडियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल वनचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.जडेजाने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२० चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळ भावनेच्या विरुद्ध आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे. बोटावर मलम लावण्याआधी जडेजाने मैदानी पंचांना कुठलीही माहिती दिली नव्हती.
या प्रकरणी सामनाधिकारी ॲण्डी पायक्रॉफ्ट यांनी काल जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांना पाचारण करीत सर्व माहिती घेतली होती. त्यांनी आपला अहवाल आयसीसीकडे पाठिवला. आयसीसी पॅनलने जडेजाला दोषी मानले कारण त्याने मैदानावरील पंचांच्या परवानगीशिवाय क्रीमसारखे काहीतरी वापरले. या कारणास्तव, डी-मेरिट गुणांव्यतिरिक्त, त्यांना दंडदेखील भरावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनपासून ते इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनपर्यंत अनेकांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले होते.