मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघातील यशस्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ पाच वन डे सामने खेळणार आहे आणि याच पाच सामन्यांतून भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा अंतिम संघ निवडला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. पण, यात जडेजाचे नाव नसल्याने वर्ल्ड कप संघात त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांसाठीच्या या मालिकेत वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. दोन ट्वेंटी-20 सामन्यांसाठीच्या संघात कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे, तर त्याच्या जागी भटिंडाच्या मयांक मार्कंडेला संधी देण्यात आली आहे. वन डे मालिकेसाठी बीसीसीआयने थोडे फेरबदल असलेले दोन संघ जाहीर केले. पहिल्या दोन वन डे सामन्यासाठीच्या संघात भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी संघात तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौलला संधी मिळाली आहे.