जामनगर - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवा जडेजा यांना एका पोलीस कर्मचा-याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस कर्मचा-याच्या दुचाकीस रिवा यांच्या कारची धडक झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच पोलीस कर्मचा-याने थप्पड मारल्याचा आरोप रिवा यांनी केला आहे. गुजरातमधील जामनगर येथील ही घटना आहे. थप्पड मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव संजय अहीर असं आहे. दरम्यान, याप्रकरणी संजय अहरीला अटक करण्यात आली आहे.
(IPL 2018 : चेन्नईच्या यशाचे गुपित जडेजाने केले जाहीर; धोनीच्या विजयाचा मंत्र जाणून घ्या...)
काय आहे प्रकरण?
रिवा जडेजा या कारने जात असताना त्यांच्या कारने पोलीस कॉन्स्टेबल संजय अहीर यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच अहीर यांनी आपल्याला मारहाण केल्याची आरोप रिवा यांनी केला आहे. रिवा घटनेच्या वेळी स्वत: कार चालवत होत्या. घटनेनंतर रिवा जडेजा यांनी जामनगर पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठून पोलीस कर्मचा-याची तक्रार केली. पोलीस अधीक्षक प्रदीप सेजुल यांनी सांगितले की, महिलेबरोबर गैरवर्तणूक करणा-या पोलीस कर्मचा-याविरोधात कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच संबंधित पोलीस कर्मचा-याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले होते.
दरम्यान, या अपघातात रिवाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पोलीस मुख्यालयाजवळच घडल्याने, हे प्रकरण तातडीने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. एसपी ऑफिसमध्ये रिवावर प्रथमोपचार करण्यात आले.