- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
सनरायझर्स हैदराबादच्या गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा पाऊस अनुभवाला मिळाला. दुर्दैवाने दोन्ही लढतींमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली असली तरी आमच्या फलंदाजांचा आत्मविश्वास ढासळलेला नाही.
चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध अंबाती रायुडूने आपला मास्टरक्लास दाखविला. त्याने आपल्या शैलीने शानदार फटके लगावत शतकी खेळी केली. रायुडूसोबत मी बराच वेळ घालविला आहे. त्याला मी सहजपणे फलंदाजी करताना बघितले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर त्याने भारताच्या वन-डे संघात पुनरागमन केले असून ही चांगली बाब आहे. तो भविष्यात आगेकूच करेल, अशी मला आशा आहे.
गुरुवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आमच्या अखेरच्या लढतीत एबी डिव्हिलियर्स व मोईन अली यांनी शानदार खेळ केला. आमची गोलंदाजी चांगली होऊ शकली असती, पण रॉयल चॅलेंजर्सने आव्हान कायम राखण्यासाठी दडपण न बाळगता खेळ केला. चांगली खेळपट्टी, फलंदाजांची आक्रमक मानसिकता आणि छोटी सीमारेषा त्याचप्रमाणे बसिल थम्पीचा ब्रेकनंतरचा सहभाग यामुळे आरसीबीला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. पण, त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, असे मला वाटते. केन विलियम्सनने दाखवून दिलेल्या वाटेवर मार्गक्रमण करीत आम्हीही चोख उत्तर दिले. केनच्या फलंदाजीची मी नेहमीच प्रशंसा केली आहे. रायुडू, के.एल. राहुल व विराट यांच्याप्रमाणे तो सुद्धा पारंपरिक फटक्यांवर विश्वास दाखवितो. या खेळाडूंनीही टी-२० क्रिकेटमध्येही पारंपरिक फटक्यांच्या जोरावर यशस्वी ठरता येते, हे सिद्ध केले आहे.
या खेळाडूंना एकदा सूर गवसला तर ते कामगिरीत सातत्य राखतात. त्यामुळेच धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये ते आघाडीवर आहेत.
प्ले-आॅफपूर्वी हैदराबाद संघाला केवळ एक लढत खेळायची आहे. गुरुवारी रात्री बेंगळुरूमध्ये आरसीबीविरुद्धच्या लढतीत मनीष पांडेने शानदार फलंदाजी केली. प्ले-आॅफमध्ये आमचे स्थान निश्चित झाले आहे, पण केकेआरविरुद्ध विजयासह आम्ही सकारात्मक विचाराने आगेकूच करण्यास इच्छुक आहोत. (गेम प्लॅन)
साखळी फेरीत अखेरच्या टप्प्यात चार लढती शिल्लक आहेत. प्ले आॅफमध्ये दोन स्थानांसाठी चुरस दिसून येत आहे. त्यामुळे आयपीएलच्या अकराव्या पर्वातील रंगत अनुभवाला मिळत आहे. आम्हाला आगेकूच करताना कुठली अडचण भासणार नाही, पण माझी नजर आठवड्याअखेरच्या अंतिम सामन्यावर केंद्रित झाली आहे.
Web Title: Rayudu, Rahul, left the impression of Virat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.