रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या आणखी एका पर्वात जेतेपदाशिवाय रहावे लागले. आयपीएल २०२४ मधील पहिल्या टप्प्यातील अपयश बाजूला सोडून RCB ने पुढे सलग सहा सामने जिंकले आणि प्ले ऑफमध्ये ऐटीत प्रवेश केला. RCB यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवेल असे वाटलेले, परंतु मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या वृत्तीने त्यांचा घात केला. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात RCB चा पराभव केला आणि चाहते पुन्हा निराश झाले. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अंबाती रायुडू याने RCB ची इभ्रत काढली.
Eliminator च्या सामन्यात बंगळुरूला ८ बाद १७२ धावा करता आल्या आणि राजस्थानने १९ षटकांत ६ बात १७४ धावा करून विजय मिळवला. RCB च्या या पराभवानंतर रायुडूने स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या कार्यक्रमात विराट कोहलीच्या संघाची टर उडवली. ''सेलिब्रेशन करून आणि आक्रमकता दाखवून आयपीएल ट्रॉफी जिंकता येत नाही. आयपीएल ट्रॉफी जिंकणे म्हणजे फक्त CSK ला हरवणे नाही. आयपीएल जेतेपद पटकावण्यासाठी तुम्हाला प्ले ऑफमध्ये चांगला खेळ करणे गरजेचे आहे,''असे रायुडू म्हणाला.