बंगळुरू - आयपीएलच्या गेल्या सत्रात आपल्यासाठी कर्दनकाळ ठरलेल्या कोलकात्याच्या चारही गोलंदाजांना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले आहे. ख्रिस वोक्स, उमेश यादव, नाथन कॉल्टरनाइल, आणि कॉलीन ग्रँडहोम या चारही गोलंदाजांना बंगळुरूने आज झालेल्या लिलावात खरेदी केले. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये या चौघांमुळेच कोहलीच्या संघाची नाचक्की झाली होती, तसंच एक अगदी नकोसा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला.
गेल्या वर्षी झालेल्या एका सामन्यात गौतम गंभीरच्या कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या, आणि 131 धावांचं माफक लक्ष्य कोहलीच्या संघाला दिलं. पण ख्रिस वोक्स, उमेश यादव, नाथन कॉल्टरनाइल, आणि कॉलीन ग्रँडहोम यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बंगळुरुचं अक्षरशः कंबरडं मोडलं आणिअवघ्या 49 धावांमध्ये बंगळुरूचा अक्खा संघ गारद झाला. यासोबतच आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक नीचांकी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. केवळ 58 चेंडुमध्ये बंगळुरू ऑल आउट झाले. कॉल्टरनाइल, वोक्स आणि ग्रँडहोम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले तर उमेश यादवने एक विकेट घेतली होती. बंगळुरूच्या एकाही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता.
विशेष म्हणजे विराट कोहली, डिव्हीलिअर्स आणि ख्रिस गेल यासारखी तगडी फलंदाजी असताना बंगळुरूची इतकी दारुण अवस्था झाली होती.
अखेर आज झालेल्या लिलावात बंगळुरूने या चारही गोलंदाजांना आपल्या भात्त्यात घेतले आहे. वोक्ससाठी 7.4 कोटी रुपये, यादव 4.2 कोटी, नाथन कॉल्टरनाइल आणि ग्रँडहोमसाठी प्रत्येकी 2.2 कोटी रुपये बंगळुरूने मोजले.