smriti mandhana । मुंबई : महिला प्रीमिअर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नासारखा राहिला. पहिल्या हंगामात आरसीबीच्या (RCB) संघाला केवळ 2 सामन्यात विजय मिळवता आला. आरसीबीच्या संघाने साखळी फेरीतील 8 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला, तर 6 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता महिला प्रीमिअर लीगची स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अंतिम फेरी गाठली आहे, तर यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. मुंबई आणि यूपी यांच्यातील विजेता संघ 26 तारखेला दिल्लीसोबत फायनल खेळेल.
स्मृती मानधना भावूक स्पर्धेला निरोप देताना स्मृती मानधना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. "आमच्या अपेक्षेप्रमाणे हा हंगाम गेला नाही पण तो माझ्यासाठी नेहमीच खास असेल. कारण तो WPL मधील पहिलाच होता आणि मी अशा अद्भुत लोकांना भेटले तसेच इतक्या मोठ्या संघासोबत काम केले", अशा शब्दांत स्मृतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्मृतीच्या एका रन साठी RCB ने मोजले लाखो रूपये...RCB ने मानधनावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये कामी आले नाहीत. आरसीबीने मानधनासाठी 3.40 कोटी रुपये खर्च केले होते. यासह स्मृती WPL ची सर्वात महागडी खेळाडू ठरली होती. ती आरसीबीचे नशीब चमकवेल आणि विजेतेपद मिळवून देईल या आशेने आरसीबीने तिच्यावर पैसे खर्च केले होते, पण मानधना फारशी कामगिरी करू शकली नाही. तिच्या 125 धावांपैकी प्रत्येक धाव RCB ला तब्बल 2.72 लाखांना पडली आहे.
कर्णधारपदाचे ओझे झेपले नाही?स्मृती मानधनाची गणना सध्या महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. WPL पूर्वी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात तिने शानदार फलंदाजी केली होती. आयर्लंडविरुद्ध 87 आणि इंग्लंडविरुद्ध 52 धावा केल्या होत्या. मात्र, तिला महिला लीगमध्ये चांगला खेळ दाखवणे शक्य झाले नाही. याचे एक कारण कर्णधारपदाचे दडपण असू शकते असे बोलले जात आहे. कर्णधारपदामुळे क्रिकेटमधील अनेक खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत, असे साधारणपणे दिसून येते. कदाचित मंधानाच्या बाबतीतही तसेच घडले असावे, असा चाहत्यांचा सूर दिसून येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"