भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून रांची येथे सुरू होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा झाल्यापासून टीम इंडियानं एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळेच 200 गुणांसह कोहलीची टीम अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करून उभी आहे. एकिकटे कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत असली तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाला एकदाही आयपीएल जेतेपद पटकावता आलेले नाही.
पण, आयपीएलच्या पुढील मोसमात बंगळुरू जेतेपद पटकावेल असा विश्वास, सर्वांना आहे. त्यादृष्टीनं संघ मालकांनी आतापासून हालचाली सुरू केल्या आहेत. बंगळुरूनं आयपीएलच्या पुढील हंगामासाठी सपोर्ट स्टाफमध्ये एका महिला कर्मचारीची नियुक्ती केली आहे. आयपीएलच्या इतिहासात सपोर्ट स्टाफमध्ये महिलेचा समावेश करणारा बंगळुरू हा पहिलाच संघ ठरला आहे. नवनिता गौतम असे या महिलेचे नाव आहे. ती मसाच चिकिस्तक म्हणून काम पाहणार आहे. प्रशिक्षक बासू शंकर ( strength and conditioning coach ) आणि मुख्य फिजिओथेरेपिस्ट इव्हान स्पीचली यांच्यासोबत ती काम करणार आहे. नियोजन करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देत राहणे आदी जबाबदारीही तिच्याकडे असणार आहेत.
कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाला मागील 13 हंगामात एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. मागील सत्रात त्याला सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बंगळुरूनं तीनवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2009, 2011 आणि 2016मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.