IPL 2024 : नुकत्याच पार पडलेल्या गॅबा कसोटीत ऑस्ट्रेलियाची झोप उडवणारा २४ वर्षीय गोलंदाज शामर जोसेफ ( Shamar Joseph ) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसू शकतो. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने पायाच्या अंगठ्याला दुखापत असूनही गोलंदाजी केली आणि ७ विकेट्स घेत विंडीजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ वर्षानंतर कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. आता शामरला आयपीएलचा करार मिळू शकतो.
यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स सोबतच्या कार्यकाळात टॉम कुरनला गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यानंतर तो मोसमातून बाहेर पडला. त्याने ILT20 2024 मध्ये डेझर्ट वाइपरसाठी देखील सामना खेळलेला नाही. कुरनने पाकिस्तान सुपर लीगमधूनही माघार घेतली असून दुखापत गंभीर असल्याची पुष्टी केली आहे. RCB ने इंग्लिश अष्टपैलू खेळाडूला १.५ कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतले. पण, तो आयपीएलमधूनही माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार RCB कुरनच्या जागी विंडीजचा युवा गोलंदाज शामर याला करारबद्ध करण्याचा विचार करत आहे.
जोसेफने दोन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजसाठी गॅबा येथे सात विकेट्स मिळवून त्याच्या संघाला आठ धावांनी एक रोमहर्षक विजय मिळवून दिला. शामरने मालिकेत १७.३१ च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या. लिलावात खरेदी केलेले खेळाडू - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - अल्झारी जोसेफ ( ११.५० कोटी), यश दयाल ( ५ कोटी), ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी), टॉम कुरन ( १.५० कोटी), सौरव चौहान ( २० लाख), स्वप्निल सिंग ( २० लाख)
जोसेफचा संघर्षमयी प्रवास... बराचरा; कॅरिबियनमधील एक गाव आणि इतके दुर्गम की न्यू ॲमस्टरडॅमहून तिथे जाण्यासाठी बोटीने सुमारे दोन दिवस लागतात. गावाची लोकसंख्या अंदाजे ३५० आहे आणि २०१८ मध्ये तिथे इंटरनेट पोहोचले... शामर जोसेफ तिथे लहानाचा मोठा झाला. मजूर म्हणून आणि नंतर १२ तासाच्या शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करू लागला. २०२३ मध्ये त्याने अचानक काम सोडण्याचा निर्णय घेतला आणि क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला...
शामरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि स्टीव्हन स्मिथ सारख्या महान फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर बाद केले. पण आज त्याने गॅबामध्ये जे काही केले आहे ते इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. त्याने भविष्यातील पिढ्यांना दाखवून दिले पाहिजे की कसोटी क्रिकेट म्हणजे काय..