मुंबई : कर्णधारपद सोडल्यानंतर फलंदाज विराट कोहलीवरील दडपण कमी झाले असावे. आयपीएल १५ च्या पहिल्या सामन्यात तो कसा यशस्वी ठरतो, याकडे रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचे लक्ष असेल. त्यांना पहिला सामना रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. दहा वर्षांत प्रथमच कोहली केवळ खेळाडू म्हणून मैदानावर दिसणार आहे.
खोऱ्याने धावा काढून आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्याचे विराटचे प्रयत्न असतील. आरसीबी आणि पंजाबला फाफ डुप्लेसिस आणि मयांक अग्रवाल यांच्या रूपात नवे कर्णधार लाभले, तरी सामन्याचे आकर्षण कोहलीच असेल. कोहलीने २०१३ ला न्यूझीलंडचा डॅनियल व्हेट्टोरीकडून नेतृत्व स्वीकारले. आठ सत्रात नेतृत्व केल्यानंतर जबाबदारीतून तो मोकळा झाला. कोहलीच्या नेतृत्वात संघाने २०१६ ला उपविजेतेपदाचा मान मिळविला होता. त्यावेळी विराटने चार शतकांसह ९०० धावा काढल्या होत्या. डुप्लेसिसला पहिल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवूड यांची उणीव जाणवेल. श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा आणि दिनेश कार्तिक यांच्यावरही नजर असेल.
n पंजाबला बेयरेस्टो याची उणीव जाणवेल. तो इंग्लंड संघातून विंडीजविरुद्ध खेळत असून, दुसरा सहकारी कॅगिसो रबाडा बांगलादेशविरुद्ध मायदेशातील मालिकेत व्यस्त आहे. मात्र, युवा आणि नवोदित खेळाडूंच्या ताकदीवर पंजाब बाजी मारू शकतो.