दुबई : मिळालेल्या संधीचे सोने करणे ही महान खेळाडूची ओळख ठरल्याचे आतापर्यंत खेळात सिद्ध झाले आहे. देवदत्त पडिक्कल या २० वर्षांच्या युवा खेळाडूने काल अशीच संधी शोधली. आयपीएल पदार्पणात स्वत:ची क्षमता दखवून दिली.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बँगलोर संघाने सलामीवीर म्हणून आॅरोन फिंच आणि युवा खेळाडू देवदत्तला संधी दिली. आतापर्यंत कर्णधार विराट कोहली सलामीला येत असे. पण विराटने यावर्षी देवदत्तला संधी दिली. यामागे देवदत्तची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी कारणीभूत ठरलीय. देवदत्तची आई पंबिनी पडिक्कल यांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माआधीच ठरवले होते की, मुलगा झाला तर त्याला क्रिकेटपटू करायचे. झालेही तसेच.
देवदत्त केरळचा असला तरी तो कर्नाटककडून खेळतो. कर्नाटकमधील लीग स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली. येथील युवा खेळाडूंसाठीच्या ‘टॅलेंट हंट’मधून देवदत्तसारखा खेळाडू गवसला. विराटने स्वत:ला तिसºया क्रमांकावर ठेवले आणि देवदत्तला सलामीला पाठवले. विराटचा त्याच्यावर किती विश्वास आहे, हे यातून दिसून आले.देवदत्तने पहिल्या सामन्यात ५६ धावांची खेळी करत एक वेगळा विक्रमदेखील केला. त्याने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. या खेळीसह तो एका खास क्लबमध्ये दाखल झाला आहे. आरसीबीकडून सहा वर्षांनंतर एखाद्या फलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी धावा केल्या. याआधी युवराजसिंग याने २०१४ साली नाबाद ५२ धावा केल्या होत्या. पण देवदत्तची गोष्टी आणखी स्पेशल आहे. क्रिकेटमधील चारही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला फलंदाज ठरला.मी फारच नर्व्हस होतो : देवदत्त‘भारताचा भावी स्टार मानला जाणारा देवदत्त अंतिम एकादशमध्ये खेळण्याची संधी मिळताच नर्व्हस झाला होता. सामन्यानंतर तो म्हणाला, ‘पदार्पणाची संधी मिळाल्याचे ऐकून नर्व्हस झालो होतो. नंतर काही चेंडू खेळताच स्वाभाविक खेळ केला. मागच्या एका महिन्यात विराटकडून बरेच शिकायला मिळाले. मी नेहमी विराटला प्रश्न करतो. विराट आणि फिंच माझे मार्गदर्शक आहेत. मी खेळत असताना वारंवार प्रेरणा देण्याचे काम फिंच करत होता,’ असे मत देवदत्तने व्यक्त केले.