Virat Kohli Rashid Khan, IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. गुजरातचा संघ आधीच २० गुणांसह अव्वल स्थानी आहे. गुजरातच्या संघाने प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळवले असून त्यांनी टॉप-२ मध्ये आपली जागा पक्की केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालाचा त्यांच्या स्थानावर फारसा फरक पडणार नाही. पण RCB साठी आजचा सामना 'करो या मरो' लढतीप्रमाणेच आहे. अशा स्पर्धात्मक परिस्थितीतही विराट कोहलीने आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या उपकर्णधाराला म्हणजे गुजरात संघाच्या राशिद खान एक स्पेशल बॅट गिफ्ट म्हणून दिली.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात RCBचे कर्णधारपद भूषवले नाही. त्याच्या जागी फाफ डू प्लेसिसला संघाचे नेतृत्व दिले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली होती. पण नंतर जशीजशी स्पर्धा तीव्र झाली, तसे RCBच्या संघाची कामगिरी थोडीशी कमी होत गेली. आता त्यांचे १३ सामन्यांत १ गुण आहेत. सध्याच्या गुणतालिकेनुसार, RCB आणि दिल्ली असे दोन संघ १४ गुणांवर आहेत. या दोन्ही संघांचे १-१ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आज RCBचा संघ पराभूत झाला तर दिल्लीला स्पष्ट विजय मिळवून १६ गुणांसह प्लेऑफची फेरी गाठता येऊ शकते. अशी अतिशय अटीतटीची परिस्थिती असतानाही विराट कोहलीने राशिद खानला विशेष गिफ्ट म्हणून आपल्या बॅट दिली. त्यामुळे विराटच्या खिलाडूवृत्तीचे आणि दिलदारपणाचे चांगलेच कौतुक होत आहे.
दरम्यान, विराटने यंदाच्या हंगामात लौकिलाला साजेशी कामगिरी केलेली नाही. एकेकाळी रन-मशिन नावाने ओळखला जाणार विराट गेल्या दोन वर्षांपासून एका शतकाच्या शोधात आहे. यंदाच्या हंगामातही विराटने १३ सामन्यांमध्ये केवळ एक अर्धशतक ठोकले आहे. त्या अर्धशतकानंतर विराट दमदार कामगिरी करेल अशी साऱ्यांना आशा होती, पण तसं घडलं नाही. विराटने आतापर्यंत १३ सामन्यात १९च्या सरासरीने २३६ धावा केल्या आहेत.