Faf Du Plessis on RCB Loss vs Mumbai Indians : IPL 2024मध्ये मुंबई इंडियन्सचे आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार डु प्लेसिसच्या ६१ आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर RCBने ८ बाद १९६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशनच्या ६९ आणि सूर्यकुमार यादवच्या ५२ धावांच्या बळावर मुंबईने १६व्या षटकातच सामना जिंकला. जसप्रीत बुमराहने विराट कोहलीसह ५ बळी टिपल्याने त्याला सामनावीर निवडण्यात आले. मुंबईने ५ पैकी दुसरा सामना जिंकला. तर बंगळुरूने ५ पैकी ४ सामने गमावले. या पराभवानंतर RCB कर्णधार फाफ डु प्लेसिस काय म्हणाला, जाणून घ्या.
सहापैकी पाच पराभव पचवणं कठीण!
"सहापैकी पाच सामन्यात पराभव ही गोष्ट पचवणे कठीण आहे. आजच्या सामन्यात आमच्या गोलंदाजीच्या वेळी सामन्यावर दव पडले आणि गोलंदाजी कठीण झाली. नाणेफेक जिंकलो असतो तर आम्हीही प्रथम गोलंदाजी घेतली असती. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना आजच्या विजयाचे श्रेय द्यायला हवे. त्यांनी आमच्या गोलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. जो फलंदाज आला त्याने तुफान फटकेबाजी केली," असे डु प्लेसिस म्हणाला.
कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
"मला असे वाटते की आमच्या फलंदाजीच्या वेळी आम्ही २००पार धावसंख्या करायला हवी होती. आमच्याकडे गोलंदाजीत तितके तगडे शिलेदार नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. आमची फलंदाजी हेच आमचे बलस्थान आहे त्यामुळे आम्हाला त्यातच अधिक चांगली कामगिरी करायला हवी होती. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, आमच्याकडे तिखट मारा करणाऱ्या गोलंदाजांची उणीव भासते. आम्हाला आज मुंबईला पॉवरप्ले मध्येच २-३ विकेट्सचे धक्के द्यायचे होते, पण ते झाले नाही. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या चार षटकांमध्येच आम्ही सामन्यात बॅकफूटला जातो आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो," असेही डु प्लेसिसने स्पष्टपणे सांगितले.
Web Title: RCB Loss vs Mumbai Indians Faf Du Plessis Very tough pill to follow as we have lacked penetration batting bowling perspective IPL 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.