रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघानं महिला प्रीमिअर लीगचं जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. आरसीबीच्या फ्रँचायझीला प्रथमच एखाद्या स्पर्धेचे जेतेपद जिंकता आलं आहे. मागील १६ वर्ष आरसीबीच्या संघानं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. पण, त्यांना एकदाही स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. मात्र महिला संघानं अवघ्या दुसऱ्याच वर्षी ही कामगिरी करून दाखवली. स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघानं ट्रॉफी जिंकल्यानंतर पुरूष संघाकडून त्यांचा गौरव करण्यात आला. चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुरूष संघातील सर्व शिलेदारांसह महिलांचा चॅम्पियन संघ उपस्थित होता.
खरं तर आरसीबीच्या अनबॉक्स इव्हेंटमध्ये आरसीबीच्या महिला संघाला पुरुष संघाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. स्मृती मानधना आणि कंपनीने WPL २०२४ चे विजेतेपद पटकावले. आयपीएल २०२४ च्या आधी एम चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये, विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी महिला संघाच्या खेळीला दाद दिली आणि त्यांचं कौतुक केलं.
दरम्यान, यावेळी कर्णधार स्मृती मानधनाच्या हातात ट्रॉफी चमकत होती. महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजेतेपदानंतर स्मृतीनं आनंद व्यक्त केला. संघाची अष्टपैलू खेळाडू एलिसे पेरीला स्मृतीनं यावेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जल्लोषाचा नजारा दाखवला.
अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमवून आरसीबीनं स्वप्न सत्यात उतरवलं. रिचा घोषनं विजयी चौकार मारून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. स्मृतीच्या संघानं ८ विकेट राखून अंतिम सामना जिंकला. मुंबई इंडियन्सला नमवून आरसीबीनं अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर, दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.