Join us  

IPL 2023: "मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना दिली खुशखबर

एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 6:53 PM

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) महत्त्वाचा सदस्य एबी डिव्हिलियर्सने (AB Devilliers) आरसीबीच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. विराट कोहली आणि डिव्हिलियर्स ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे. डिव्हिलियर्स आगामी आयपीएल हंगामात दिसणार का याबाबतच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्या होत्या. आता खुद्द डिव्हिलियर्सने सोमवारी ट्विटर स्पेसेसद्वारे संवाद साधत त्याच्या पुनरागमनाच्या चर्चांवर भाष्य केले आहे. ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सशी बोलताना 38 वर्षीय क्रिकेटपटू म्हणाला की तो पुढील वर्षी चिन्नास्वामी (बंगळुरू फ्रँचायझीचे होम ग्राउंड) येथे परतणार आहे.

दरम्यान, मला माझ्या चाहत्यांचे आभार मानायचे आहेत असे देखील डिव्हिलियर्सने म्हटले आहे. खरं तर मिस्टर 360 खासकरून चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चिन्नास्वामीवर परतणार आहे. त्यामुळे आयपीएल 2022 दरम्यान दिलेल्या त्याच्या विधानामुळे उद्भवलेल्या सर्व अटकळांना त्याने पूर्णविराम दिला आहे. "मी पुढच्या वर्षी आयपीएलच्या आसपास नक्कीच येईन. मला माझ्या दुसऱ्या घरी परतायला आवडेल", असे डिव्हिलियर्सने VUSport शी बोलताना सांगितले.

माझ्या दुसऱ्या घरी परतायचंय - डिव्हिलियर्स आयपीएलबाबत बोलताना मिस्टर 360 ने म्हटले, "पुढच्या वर्षी मी आरसीबीच्या आसपास नक्की असेन, मी ते सध्या चुकवत आहे, कोणत्या क्षमतेत माहित नाही पण मला माझ्या दुसऱ्या घरी म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमला भेट द्यायची आहे, मी त्याची वाट पाहत आहे", असे डिव्हिलियर्सने अधिक म्हटले. 

मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध एबी डिव्हिलियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे अत्यंत जवळचे नाते राहिले आहे. किंग कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीचे लाखो चाहते आहेत. डिव्हिलियर्स 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा हिस्सा झाला होता. आयपीएलमध्ये 170 डावांत 38.70 च्या सरासरीने आणि 151.68 च्या स्ट्राईक रेटसह धावा करणाऱ्या डिव्हिलियर्सचा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहावा क्रमांक लागतो. डिव्हिलियर्सने 228 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9,577 धावा करून महान खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली आहे. मिस्टर 360 भारताविरूद्ध कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आफ्रिकन फलंदाज आहे, 2008 मध्ये 217 धावा करून त्याने ही किमया साधली होती. 

 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२२द. आफ्रिका
Open in App