आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्मा मेगा लिलावात आल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला आपल्या ताफ्यात घ्यायला हवे, असे मत माजी भारतीय खेळाडूने मांडले. अलीकडेच बीसीसीआयने आयपीएलच्या लिलावाआधी काही नवीन नियम जाहीर केले. नवीन नियमावलीनुसार, प्रत्येक फ्रँचायझीला आता सहा खेळाडूंना रिटेन करता येईल. भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला मुंबईची फ्रँचायझी रिटेन करेल असे अपेक्षित आहे. मात्र, हिटमॅन लिलावात आला तर त्याला आरसीबीने नक्कीच घ्यायचा विचार करायला हवा, असे मोहम्मद कैफने म्हटले.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. मात्र, मागील वर्षी मुंबईच्या फ्रँचायझीने कर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात घातली. सर्वात ग्लॅमरस संघांपैकी एक असलेल्या मुंबईच्या संघाच्या चाहत्यांना मात्र ही बाब खटकली. हार्दिक मैदानात येताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आयपीएल २०२४ म्हणजे हार्दिक पांड्यासाठी जणू काही वाईट स्वप्नच... त्याच्या नेतृत्वात मुंबईला १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले.
हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली. त्याच्या दुसऱ्या हंगामात त्यांना उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन, झहीर खान यांसारख्या दिग्गजांनी या संघाचे प्रतिनिधित्व केले पण यश अद्याप तरी मिळाले नाही.आरसीबीने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना मोहम्मद कैफने सांगितले की, रोहित शर्मा लिलावात आल्यास आरसीबीने त्याचा विचार करायला हवा. ते रोहितकडे कर्णधार म्हणून देखील पाहू शकतात. तो कदाचित मोठी खेळी करणार नाही मात्र, मला खात्री आहे प्लेइंग इलेव्हन कशी तयार करायची हे रोहितला चांगलेच ठाऊक आहे. मला तर वाटते की, रोहितने आयपीएलमध्ये केवळ कर्णधार म्हणून खेळावे. लीडर म्हणून त्याची कामगिरी सर्वोत्तम आहे. त्याने अलीकडेच भारताला विश्वचषक जिंकवून दिला. कोणत्याही फ्रँचायझीने ऑफर दिल्यास त्याने कर्णधारपदाचा विचार करावा.