बंगळुरू - इंडियन प्रीमिअर लीगच्या(आयपीएल) 11व्या पर्वासाठी आज बंगळुरूत खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. गेल्यावर्षी गेलला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता न आल्यामुळं आरसीबीने त्याला घरचा रस्ता दाखवला. पण आरसीबीने आपल्या रणनीतीप्रमाणे संघात 3 विस्फोटक फलंदाज कायम ठेवले आहेत.
आधीच विराट कोहली आणि डिव्हिलर्स यांना आरसीबीने कायम ठेवले होते. आज झालेल्या लिलावात आरसीबीने ब्रँडन मॅक्क्युलमवर जुगार खेळला आहे. ब्रँडन मॅक्क्युलमने 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात 158 धावांची खेळी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3 कोटी 60 लाख रुपयात त्याला खरेदी केलं आहे.
आरसीबीने ब्रँडन मॅक्क्युलमला सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले आहे. विराट कोहलीसोबत तो डावाची सुरुवात करेल. गेलप्रमाणेच तो आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहली, डिव्हिलर्स आणि ब्रँडन मॅक्क्युलम असे विस्फोटक त्रिकोट पुन्हा एकदा आरसीबीने तयार केले आहे.
आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपल्या ताफ्यात जास्तीत जास्त 24 खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा आहे. त्यानुसार आज झालेल्या लिलावात संघ मालकांनी आपापला संघ मजबूत करण्य्यासाठी दिगग्ज खेळाडूंना संघात स्थान दिले तर काहिना घरचा रस्ता दाखवला. म्हणून गेलला आरसीबीने दाखवला घरचा रस्ता - आज झालेल्या आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या एकाही संघानं गेलला खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली नाही. आयपीएलच्या दहाव्या सत्रात गेलला आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यानं केवळ एकाच सामन्यांमध्ये जोरदार फटकेबाजी केली होती. खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला. दहाव्या आयपीएलमध्ये आरसीबीने गेलला दहा सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी दिली होती. मात्र, गेलने दहा सामन्यात फक्त 200 धावा काढल्या होत्या, तो पूर्णपणे अपयशी ठरला, आयपीएलमध्ये गेलने 101 सामन्यात 3626 धावा कुटल्या आहेत.आज गेलबरोबरच इंग्लडचा कर्णधार रूटवरही कोणीही बोली लावली नाही. त्यामुळं या दोघांना उद्या पुन्हा लिलावात उपलब्ध राहणार आहेत.