विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील वनडेतील चौथ्या क्वार्टर फायनलमध्ये बडोदा विरुद्ध कर्नाटक यांच्यात स्पर्धेतील चौथा क्वार्टर फायनल सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात कर्नाटकच्या ताफ्यातील देवदत्त पडिक्कल याने दमदार शतकी खेळी करत संघासाठी बहुमूल्य योगदान दिले. पडिक्कलने ९९ चेंडूत १०२ धावांची शानदार खेळी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या भात्यातून निघालेले हे नववे शतक आहे.
देवदत्त पडिक्कलची दमदार सेंच्युरी
बडोदा संघानं नाणेफेक जिंकून कर्नाटकला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यावर कर्नाटकच्या ताफ्यात जॉईन झालेल्या पडिक्कलनं फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार मयंक अग्रवालच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. कर्णधार मयंक अग्रवाल १५ चेंडूत अवघ्या ६ धावांवर माघारी फिरल्यावर पडिक्कल सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत दमदार सेंच्युरी ठोकली.
दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी
पडिक्कल याने अवनीशच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. पडिक्कलने आपल्या शतकी खेळीत १५ चौकार आणि २ षटकार ठोकले. दुसऱ्या बाजूला अवनीशने ६४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी साकारली. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत तो भारतीय संघाच्या ताफ्यात होता. हा दौरा त्याने बाकावर बसूनच काढला. पडिक्कल डिसेंबर २०२३ नंतर कर्नाटककडून लिस्ट ए सामन्यात खेळताना दिसले. शतकासह त्याने दमदार कमबॅक करून दाखवले आहे.
आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, मग...
आयपीएलच्या मेगा लिलावात देवदत्त पडिक्कल याला अनसोल्डचा टॅग लागल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यावर घरची टीम असलेली आरसीबी फ्रँचायझी संघ लोकल बॉयवर मेहरबान झाला. RCB नं २ कोटी या बेस प्राइजसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेत 'घरवापसी'ची संधी दिली. RCB नं आपल्यावर खेळलेला हा डाव वाया जाणार नाही, असे संकेतच त्याने शतकी खेळीतून दिल्याचे दिसून येते.
देवदत्त पडिक्कलची लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरी
पडिक्कल कर्नाटकसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. डावखुरा फलंदाजाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये फक्त ३० डावांमध्ये ८२.३७ च्या सरासरीने १९७७ धावा केल्या आहेत. यात ९ शतकांसह ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
Web Title: RCB Star Devdutt Padikkal smashes hundred in Vijay Hazare quartefinal vs Baroda
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.