Join us

IPL 2023, RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 'मॅच विनर'ची आयपीएलमधून माघार; विराट कोहली टेंशनमध्ये

IPL 2023 : फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:48 IST

Open in App

IPL 2023 : फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. पण, त्यांना आज मोठा धक्का बसला आहे. RCBचा मॅच विनर फलंदाज रजत पाटीदार ( Rajat Patidar) याने आयपीएलमधून टाचेच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. RCB ने पहिल्याच सामन्यात विराट कोहली व फॅफड्या रेकॉर्ड ब्रेकिंग फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला पराभूत केले. आता त्यांचा दुसरा सामना इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणार आहे.  

RCB ने आज रजतच्या माघारीची अधिकृत घोषणा केली. रजत दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही, परंतु तो आता संपूर्ण आयपीएल हंगाम खेळणार नसल्याचे RCB ने जाहीर केले. RCB ने  ट्विट केले की,'' दुर्दैवाने रजत पाटीदार आयपीएल २०२३ मधून टाचेला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करणार आहोत. प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनी रजतच्या जागी कोणाला घ्यायचे याचा निर्णय अद्याप तरी घेतलेला नाही.''  

आयपीएल २०२२ मधील दमदार कामगिरीनंतर RCB ने रजतला १६व्या पर्वासाठी रिटेन केले. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी दाखल झाला होता. सुरुवातीला तो केवळ आयपीएलचा पहिला टप्पा नाही खेळू शकेल, अशी चर्चा होती. पण, आज त्याने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली. मध्य प्रदेशच्या या खेळाडूने आयपीएलमध्ये १२ सामन्यांत ४०+च्या सरासरीने ४०४ धावा केल्या आहेत.   

आयपीएल २०२३ मधून माघार घेणारे खेळाडू  

  • मुंबई इंडियन्स - जसप्रीत बुमराह, झाय रिचर्डसन
  • चेन्नई सुपर किंग्स - मुकेश चौधरी, कायले जेमिन्सन
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- रजत पाटीदार, विल जॅक्स
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत
  • पंजाब किंग्स - जॉनी बेअरस्टो
  • राजस्थान रॉयल्स - प्रसिद्ध कृष्णा
  • गुजरात टायटन्स- केन विलियम्सन 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App