शारजा : स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला मागचा दारुण पराभव विसरून आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयी पथावर येण्याचे कडवे आव्हान असेल. चेन्नईला मात्र मुंबई इंडियन्सवर नोंदविलेल्या विजयाचा लाभ मिळणार आहे.आरसीबीला गुणतालिकेत पहिल्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास त्यांच्या फलंदाजांना चांगला खेळ करावाच लागेल. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. मधल्या फळीकडूनही संघाला मदत मिळताना दिसत नाही. केकेआरविरुद्ध त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना लाैकिकानुसार फटकेबाजी करावी लागेल.गोलंदाज केकेआरविरुद्ध फारसे प्रभावी ठरले नव्हते. मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, काइल जेमिसन, लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू वाहिंदु हसरंगा हे सर्व जण प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुष लावू शकले नव्हते. दुसरीकडे चेन्नईचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने मुंबईविरुद्ध ५८ चेंडूत शानदार ८८ धावा ठोकल्या. डुप्लेसिस आणि मोईन अली यांना खाते उघडण्यात अपयश आले तर अंबाती रायडू जखमी होऊन परतला होता. अनुभवी धोनी आणि सुरेश रैना अपयशी ठरताच ४ बाद २४ अशा स्थितीतून ऋतुराजने रवींद्र जडेजा आणि ब्राव्हो यांच्या सोबतीने संघाला संकटातून बाहेर काढले.
यानंतर दीपक चहर आणि ब्राव्हो यांनी गोलंदाजीत कमाल करीत सहावा विजय मिळवून दिला. सीएसकेकडे इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरेनच्या रूपात चांगला पर्याय आहे. त्याने मागच्या सत्रात फारच दमदार कामगिरी केली होती. सीएसकेवर विजय मिळवायचा झाल्यास आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूला शंभर टक्के योगदानासाठी सज्ज रहावे लागणार आहे.