इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर आज पाहायला मिळाला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू यांनी दमदार खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला पराभूत केले. या विजयानं CSKला फार फायदा होणार नसला तरी RCBचे टॉप टू मध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. ऋतुराजच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह CSKने मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.
आरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. फॉर्मात असलेल्या सॅम कुरननं चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिंचला ( १५) बाद केले. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीनं RCBच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. विराटनं ४३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार मारून माघारी परतला. RCBनं २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. CSKकडून सॅम कुरननं १९ धावांत ३, तर दीपक चहरनं दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला ४६ धावांची सलामी मिळवून दिली. ख्रिस मॉरिसनं सहाव्या षटकात १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावा करणाऱ्या फॅफला बाद केले. संयमी खेळ करताना ऋतुराजनं अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. रायुडू २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऋतुराजनं ४२ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनं ५१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद ६५ धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनी १९ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं १८.४ षटकांत २ बाद १५० धावा करून सामना जिंकला.
चेन्नई सुपर किंग्सनं या विजयासह RCBविरुद्ध सर्वाधिक १६ विजय मिळवण्याच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. चेन्नईचा हा RCBवरील १६ वा विजय ठरला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स व किंग्स इलेव्हन पंजाब ( प्रत्येकी १४) यांचा क्रमांक येतो.