इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहेत. आता उर्वरित तीन जागांचा निर्णय आजच्या आणि उद्याच्या लढतीनंतर होईल. पण, उर्वरित दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स वगळता अन्य तीन संघांना एखादी चूक महागात पडू शकते. त्यात आज दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यातील विजेता प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का करेल.
दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. DCच्या संघात अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल व डॅनिएल सॅम यांचे पुनरागमन झाले, तर RCBच्या संघात शिवम दुबे व शाहबाज अहमद यांना संधी मिळाली. जोश फिलिफ आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBच्या डावाची सुरुवात केली. कागिसो रबाडानं पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिलिफ ( १२) माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहली व पडीक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. आर अश्विननं ही भागीदारी संपुष्टात आणताना कोहलीला ( २९) माघारी पाठवले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या डावात आर अश्विननं प्रथमच विराटला बाद केलं. RCBच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी अश्विनला १२५व्या चेंडूची वाट पाहावी लागली.
पडीक्कलनं ४० षटकांत अर्धशतक पूर्ण केलं. IPL 2020मधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. यासह त्यानं लोकेश राहुलच्या पाच अर्धशतकांशी बरोबरी केली. पदार्पणात अनकॅप भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शिखऱ धवननं २००८मध्ये दिल्ली डेअरडेव्हिलसाठी ४ अर्धशतकं झळकावली होती. श्रेयस अय्यरनं २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी ४ अर्धशतकं केली होती.