कोलकाता - दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता संघ आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरुवात करत आहे. कोलकातासमोर तगड्या बंगळुरुचे विराट आव्हान असणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरुचा संघ संतुलित आणि बलाढ्य दिसत आहे. गेल्या दहा वर्षात बंगळुरुने आंतिम चार संघात पाच वेळा प्रवेश मिळवला आहे. बंगळुरुच्या संघाने तीन वेळा (2009, 2011 आणि 2016) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पण एकदाही विजय साकार करता आला नाही.
दुसरीकडे कोलकाताचा संघ दोन वेळाचा आयपीएलचा विजेता आहे. पण कोलकाताने गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. यावेळी गंभीरकडे दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद आहे. कोलकाता आणि बंगळुरु संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाताने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर बंगळुरुला 9 वेळा विजय मिळवता आला आहे. मिचेल स्टार्क दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळं कार्तिकपुढे जॉनसन आणि आर विनय कुमार हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा यांच्यावर कोलकाता संघाची भिस्त असणार आहे.
दुसरीकडे, तुफान फॉर्ममध्ये असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या हातात पुन्हा एकदा बंगळुरु संघाची कमान आहे. विराट कोहलीच बंगळुरुची सर्वात मोठी ताकत आहे. विराटने आयपीएलच्या एका सत्रात चार शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्कुलम, डीकॉक, ख्रिस वोक्स यांची कामगिरी बंगळुरु संघाची ताकद आहे. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीला उमेश यादव आणि टिम साऊदी ही वेगवान मारा करणारी जोडी असेल. कोरी अंडरसन, कॉलिन डि ग्रँडहोमी आणि ख्रिस वोक्स सारखे तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत.
प्रतिस्पर्धी संघ :
बंगळुरु संघ: विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरे अँडरसन, कॉलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी.
कोलकाता संघ: दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.