मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात हा सामना होत आहे आणि विजयी संघ प्ले ऑफचं तिकिट पक्क करणार आहे. देवदत्त पडीक्कल आणि जोश फिलिफ या जोडीनं RCBला दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स आज अपयशी ठरले असले तरी देवदत्तनं MIच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, अन्य फलंदाजांनी नांगी टाकल्यानं RCBला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) सलग तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात कोणताही बदल नाही, तर RCBच्या ताफ्यात तीन बदल आहेत. आरोन फिंचच्या जागी सलामीला आलेल्या जोश फिलिफनं युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलसह RCB ला सावध सुरुवात करून दिली. IPL 2020 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिफनं २४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. राहुल चहरनं त्याला बाद केले. RCBला ७१ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पडीक्कलनं त्याचा फॉर्म कायम राखला. त्यानं ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
कर्णधार विराट कोहलीला ( ९) मोठी खेळी करता आली नाही. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सौरभ तिवारीनं झेल टिपून कोहलीला माघारी पाठवले. एबी डिव्हिलियर्सची ( १५) तोफ आज थंडावली. किरॉन पोलार्डन त्याला स्लोव्हर फुलटॉसवर बाद केले. शिवम दुबेला ( २) जसप्रीत बुमराहनं त्याला बाद केले. त्याच षटकात बुमराहनं RCBला मोठा धक्का देताना देवदत्तला माघारी पाठवले. देवदत्त ४५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार मारून ७४ धावांवर माघारी परतला. ख्रिस मॉरिसही ( ४) ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक करताना RCBला २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.