जे काम ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (आरसीबी) केले, तेच काम सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा यांनी मुंबई इंडियन्ससाठी केले. या दोघांच्या स्फोटक शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा द्विशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना आरसीबीला ६ गड्यांनी नमवले. आरसीबीने २० षटकांत ६ बाद १९९ धावा केल्यानंतर मुंबईने १६.३ षटकांत ४ बाद २०० धावा केल्या.
यासह मुंबईने गुणतालिकेत आठव्या स्थानावरुन थेट तिसरे स्थान पटकावले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इशान किशनने मुंबईला वेगवान सुरुवात करुन देताना कर्णधार रोहित शर्मासह २८ चेंडूंत ५१ धावांची दमदार सलामी दिली; मात्र पाचव्या षटकात वानिंदू हसरंगाने दोघांनाही बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव-नेहल वधेरा यांनी सामन्याचे चित्रच पालटताना ६६ चेंडूंत १४० धावांची तुफानी भागीदारी केली. १६व्या षटकात विजयकुमार व्यषकने सूर्याला झेलबाद केले, मात्र तोपर्यंत सामना आरसीबीच्या हातून निसटला होता. सूर्या आणि वधेरा यांचे अर्धशतक मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले.
मुंबईच्या या विजयानंतर नेहल वधेरा मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जे म्हटलं, त्याचं कौतुक होत आहे. वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मज्जा आली. याआधी मी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. मी आज अर्धशतक केले. मात्र मला अर्धशतक केल्याचा आनंद आहेच, पण माझा संघ विजयी झाला याचा मला अधिक आनंद आहे, असं नेहल वधेरा यांनी सांगितलं. सूर्याभाई हा उच्च दर्जाचा खेळाडू आहे आणि मी त्याचे काही शॉट्स कॉपी करण्याचाही प्रयत्न करतो पण मी करू शकत नाही. तो फलंदाजी करत असताना मी त्याच्याशी बोलत होतो आणि तो खेळत राहा, खेळत राहा म्हणत होता आणि तो मला आत्मविश्वास देत होता, असं वधेराने सांगितले.