रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) जर्सीत मोठा बदल होणार आहे. बंगळुरूचा संघ आतापर्यंत लाल जर्सीत खेळताना दिसला आहे. पण या संघाच्या जर्सीचा रंग बदलणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाच्या जर्सीला एक वेगळा रंग चढणार आहे. २३ एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हा संघ हिरव्या जर्सीत दिसणार आहे. 'गो ग्रीन' उपक्रमांतर्गत जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगळुरू संघ २०११ पासून आयपीएलच्या प्रत्येक पर्वात एका सामन्यात हिरवी जर्सी परिधान करत आहे. या जर्सीच्या माध्यमातून टीम हरित आणि स्वच्छ पर्यावरणाबाबत जनजागृती करत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०११मध्ये पहिल्यांदा हिरवी जर्सी घातली होती. त्यादरम्यान संघाने कोची टस्कर्सविरुद्धच्या सामन्यात १२६ धावांचे लक्ष्य ९ विकेट्स राखून पार केले होते. दिलशान आणि गेलने एकहाती सामना जिंकला. याशिवाय, २०२२मध्ये संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या वेळी हिरव्या जर्सीचा वापर केला होता.
२०२३ च्या मोसमाबद्दल बोलायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चांगली कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत ३ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे. संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्सने पराभव केला होता. यानंतर संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ८१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि नुकत्याच झालेल्या एका रोमांचक सामन्यात संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १ धावेने पराभव पत्करावा लागला.
फॅफ ड्यू प्लेसीस आणि विराट कोहली संघासाठी चांगली फलंदाजी करत आहेत. दोन्ही फलंदाज संघासाठी धावा करत आहेत. विराट उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पण याशिवाय संघाची मधली फळी आणि गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. यंदा संघाला चमत्कार घडवायचा असेल, तर संघाला आगामी सामने जिंकावे लागतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"