११ व्या पर्वात आमच्या पाच लढती झाल्या. पण निकाल कल्पनेपलीकडचे आले. एक विजय आणि चार पराभव. आमच्या कुवतीपेक्षा हे खराब निकाल आहेत. त्यामुळे लय परत मिळविण्याची आणि मुसंडी मारण्याची वेळ आली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करावीच लागेल. ही प्रक्रिया सरावाद्वारे सुरू झाली असून आता सामना खेळण्याची वेळ आहे.क्रिकेट जाणकारांनी संघाच्या संतुलितपणावर प्रश्नचिन्ह लावले. पण मी या मताशी सहमत नाही. संघात योग्य खेळाडूंची निवड करण्यात आली असून आमचा संघ संतुलित आहेच. सातत्यपूर्ण कामगिरीवर आमचा विश्वास आहे. दडपणात काही मनाविरुद्ध घडले की संशय निर्माण व्हायला लागतो. पण प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरीच्या मार्गदर्शनात आमचा संघ स्पर्धेत मुसंडी मारेल आणि गुणतालिकेत आघाडीवर पोहोचण्याची क्षमता बाळगतो, याबद्दल मी आश्वस्त आहे.आमच्या पुढील चार लढती घरच्या मैदानावर अर्थात चिन्नास्वामी स्टेडिमयवर खेळल्या जातील. पुढील दहा दिवस आमची घसरलेली गाडी रुळावर परत आणण्याची संधी आहे. एक-दोन विजय मिळाल्यास आत्मविश्वास परत येतो.रविवारी मुंबईविरुद्ध झालेला पराभव निराशादायी ठरला. उमेश यादवने सुरुवातीच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद करीत आम्हाला झकास सुरुवात करून दिली. त्यानंतरही पराभव पदरी पडल्याने घोर निराशा झाली. रोहित शर्माने चमकदार फलंदाजी करीत मुंबईला २१३ पर्यंत पोहोचविले. मुंबईचा विजय आमच्यासाठी मानसिक धक्का होता. इतक्या मोठ्या धावा झालेल्या पाहून आमच्या फलंदाजांनी धसका घेतला होता. त्यानंतरही कर्णधार विराट कोहली याने संघर्ष करीत ९२ धावा कुटल्या.
आज शुक्रवारी डेअरडेव्हिल्स आमच्याविरुद्ध बेंगळुरुत खेळणार आहे. हा संघ देखील तालिकेत सध्या तळाच्या स्थानावर आहे. हा रोमहर्षक सामना असेल. त्यात स्वत:मधील उणिवा दूर सारून डावपेचांनुसार आम्ही विजय मिळवून चाहत्यांना सुखद धक्का देऊ शकतो. आमचे चाहते या विजयाचे हकदार ठरतात. (टीसीएम)