Join us  

RCB महिलांचा 'जय हो'; सचिन-सेहवागला आनंद, एका शब्दात 'विराट' कौतुक

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 1:11 PM

Open in App

नवी दिल्ली - आयपीएलच्या हंगामात आरसीबीने तीनवेळा अंतिम सामन्यात धडक मारली. मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात तिन्ही वेळेस जेतेपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे, दिल्लीत महिला आरसीबीने चॅम्पियनशीप मिळवल्यानंतर कोहलीलाही विराट आनंद झाल्याचे दिसून आले. तर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंदर सेहवासह दिग्गज खेळाडूंनी वुमेन टीम आरसीबीचं कौतुक केलंय. दरम्यान, स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली. दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. 

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. मागील हंगामातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्सला यंदा देखील उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. मुंबई इंडियन्सला पराभूत करून फायनलचे तिकीट मिळवलेल्या आरसीबीने सांघिक खेळी केली. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत चमक दाखवत स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली. दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. 

एकीकडे तीनवेळा अंतिम फेरी गाठूनही विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील आरसीबी संघाला ट्रॉफी उंचावता आली नाही. सन २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरबीसीने आयपीएलच्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. मात्र, चॅम्पियन बनण्याचे 'विराट' स्वप्न अर्धवटच राहिले आहे. मात्र, स्मृती मानधनाच्या नेतृत्वात महिला संघाने ही किमया करुन दाखवली. त्यानंतर, विराट कोहलीने आरसीबी वुमन संघाच्या विजयात सहभागी होत व्हिडिओ कॉलद्वारे आनंद व्यक्त केला, महिला संघाचे अबिनंदनही केले. टीम वुमन आरसीबीचे एका शब्दात विराट कौतुकही केले. विराटने 'सुपरवुमन' म्हणत आयपीएल चॅम्पियन संघाचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. तर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व विरेंदर सेहवागसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सने ट्विट करुन आरसीबीच्या विजयाचं अभिनंदन केलं आहे. 

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंदर सेहवाग यांनीही महिला आरसीबी संघाचे अभिनंदन केले आहे. महिला संघाला मोठा विजय मिळवून  देण्यासाठी @RCBTweets संघाचे अभिनंदन. @wplt20 च्या माध्यमातून भारतात महिला क्रिकेटला प्रतिसाद मिळत असून खऱ्या अर्थाने ते वाढत आहे, असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. तर, WPL जिंकल्याबद्दल RCB चे खूप खूप अभिनंदन. कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवून तुम्ही विजयाचे हक्कदार बनला, असे ट्विट सेहवागने केले आहे.  दरम्यान, याच महिन्यात आयपीएलच्या १७ व्या हंगामाला सुरुवात होत असून २२ मार्च रोजी पहिलाच सामना आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होत आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२४सचिन तेंडुलकरविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरस्मृती मानधना