अहमदाबाद : स्टार खेळाडूंचा समावेश असलेला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघ सोमवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) पराभूत करीत विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असेल. सलग चार विजयासह एकवेळ तालिकेत अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाची गेल्या तीन पैकी दोन सामन्यांतील पराभवामुळे तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऋषभ पंत व शिमरोन हेटमायर या आक्रमक जोडीविरुद्ध अंतिम षटकात १४ धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरला नसता तर आरसीबी संघ गेल्या तिन्ही सामन्यात पराभूत झाला असता. केकेआरवर वर्चस्व गाजवण्यासाठी आरसीबीची भिस्त आघाडीच्या फळीतील फलंदाज कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर केंद्रीत झालेली असेल. प्रतिभावान युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. कारण राजस्थान रॉयल्सविरुद्ध १०१ धावांची खेळी केल्यानंतर त्याला विशेष प्रभावी खेळी करता आली नाही. इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली मोसमाची विजयाने सुरुवात करणाऱ्या केकेआर संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. संघाला सातपैकी पाच सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. हा संघ सध्या सहाव्या स्थानी असून त्यांच्यावर सलग तिसऱ्या सत्रात प्ले-ऑफपूर्वी गाशा गुंडाळण्याचे संकट आहे.
केकेआरसाठी सर्वांत निराशाजनक बाब म्हणजे त्यांच्या आघाडीच्या फळीचे अपयश आहे. नितीश राणा व राहुल त्रिपाठी संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरले आहेत. गिल संघर्ष करीत असून चांगल्या सुरुवातीचे त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही.
Web Title: RCB's big challenge ahead of KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.