आरसीबीच्या विजयाची ‘हॅटट्रिक’

गुणतालिकेत अव्वलस्थान; कोलकाताचा ३८ धावांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:40+5:302021-04-19T04:14:01+5:30

whatsapp join usJoin us
RCB's 'hat trick' of victory against kolkata | आरसीबीच्या विजयाची ‘हॅटट्रिक’

आरसीबीच्या विजयाची ‘हॅटट्रिक’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


- अयाज मेमन
  
चेन्नई : ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित माऱ्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (आरसीबी) सलग तिसरा विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) ३८ धावांनी पराभव केला. यासह पुन्हा एकदा आरसीबीने गुणतालिकेत अव्वलस्थानी कब्जा केला.
चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या आरसीबीने ४ बाद २०४ धावांचा डोंगर उभारल्यानंतर कोलकाताला ८ बाद १६६ धावांमध्ये रोखले. कोलकाताकडून शुभमान गिलने आक्रमक सुरुवात केली, मात्र त्यानंतर त्यांना ठराविक अंतराने धक्के बसले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आवश्यक धावगती गाठण्यात यश न आल्याने दबावात आलेल्या कोलकाताकडून अनेक चुका झाल्या. अखेरच्या षटकांमध्ये आंद्रे रसेलला फटकेबाजी करण्यात म्हणावे तसे यश आले नाही. त्याने १९व्या षटकात मोहम्मद सिराजविरुद्ध केवळ एकच धाव घेतली. यामुळे कोलकाताच्या धावगतीवरही परिणाम झाला. कायल जेमिसन, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी दमदार मारा केला.
त्याआधी, मॅक्सवेल व एबी यांनी कोलकाताच्या गोलंदाजीची पिसेच काढली. विराट कोहली (५) व रजत पाटिदार (१) अपयशी ठरल्यानंतर मॅक्सवेलने १५९.१८च्या स्ट्राईक रेटने हल्ला चढवला. त्याने ४९ चेंडूंत ७८ धावा केल्या. एबीने त्याहून पुढे एक पाऊल टाकत २२३.५२च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत आरसीबीला दोनशेपलीकडे नेण्यात मोलाचे योगदान दिले. दोघांनी प्रत्येकी ९ चौकार व ३ षटकार ठोकले. सुरुवातीला भेदक वाटणारी कोलकाताची गोलंदाजी एबी-मॅक्सवेल यांच्यापुढे एकदमच कमजोर भासली. आरसीबीने अखेरच्या तीन षटकांत ५६ धावांचा तडाखा दिला. गेल्या सामन्यात पाच बळी घेतलेल्या आंद्रे रसेलला यावेळी केवळ  २ षटकांत ३८ धावांचा चोप बसला.

Web Title: RCB's 'hat trick' of victory against kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.